आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी सातारा येथील मराठा समाजातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी थांबवावी, त्यांनी विनाकारण मराठा समाजात फूट पाडू नये, अशी विनंती देखील महिलांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दरे गावात जनता दरबार घेतला. या दरबारात अनेक मराठा बांधव तसेच महिलांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी विनंती महिलांनी केली.
मराठा समाज सुरुवातीपासूनच मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे. ओबीसी बांधवांच्या तोंडातील घास आम्हाला हिरावून घ्यायचा नाही. आम्ही 96 कुळी मराठा असून कर्तृत्वावर मोठे होऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या कर्तृत्वावर स्वराज्य निर्माण केले होते, असं देखील मराठा समाजातील महिला म्हणाल्या.
मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवावं विनाकारण मराठा बांधव आणि ओबीसींमध्ये फूट पाडू नये, त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं असेल, तर त्यांनी ते विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी मागावं, आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशी विनंती देखील महिलांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या जनता दरबारात नागरिकांच्या मागण्या तसेच तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना दिला.