मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून (१७ सप्टेंबर) पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. अंतरवाली सराटी येथे सोमवारी रात्री १२ वाजेपासून त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैदराबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, अशा मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते उपोषण करणार असल्याने शिंदे सरकारचं चांगलंच टेन्शन वाढणार आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी ५ वेळा आमरण उपोषण देखील केलं आहे. परंतु अद्याप मराठा समाजाला अद्याप ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालेलं नाही.
मागील पाच उपोषणात सरकारने जरांगे यांची मनधरणी करत उपोषण सोडवण्याची विनंती केली होती. सरकारच्या विनंतीला मान देऊन जरांगे यांनी वेळोवेळी उपोषण देखील सोडले. परंतु त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य झालेल्या नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता राज्य सरकारने विशेष अधिवेशन देऊन स्वतंत्र आरक्षण दिलंय.
मात्र हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे सगेसोयरेंची अधिसूचना काढून मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांची ही मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.