मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. २६ फेब्रुवारीपासून हे आरक्षण लागू झाले आहे. याबाबत शासन निर्णयासह राजपत्र जारी करण्यात आले.
विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. यासंदर्भात शासन निर्णय, बिंदुनामावली आणि राजपत्रही जारी करण्यात आले आहे. कायदा आणि न्यायपालिका विभागाचे सचिव सतीश वाघोले यांनी सही केली आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला स्वतंत्र संवर्गातंर्गत नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू झाले आहे.
‘मला आनंद आहे. मी शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण लागू झालं. जीआर निघाला. या आरक्षणाचा मराठा तरुणांना नोकरी आणि शिक्षणात फायदा होईल. याचं मला समाधान आहे. या निर्णयाचा फायदा मराठा समाजाने घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने बोललो,ते पूर्ण केलं,असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘मला कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याचा आनंद आहे, असेही शिंदे म्हणाले.