जालन्यातल्या वडीगोद्री या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणस्थळी घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी मराठा आणि ओबीसी आंदोलक समोरासमोर आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये मोठी घोषणाबाजी करण्यात आली. वडीगोद्री येथून मनोज जरांगे समर्थकांच्या गाड्या जात होत्या, त्यावेळी आमच्या गाड्या का अडवून ठेवल्या आहेत? त्यांच्या कशा सोडता असा प्रश्नही ओबीसी आंदोलकांनी पोलिसांना विचारला.
ही वार्ता मनोज जरांगे यांच्या कानी पडताच त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. मराठ्यांची वाहने अडवणारा पोलीस अधिकारी कोण? त्याचा इथे काय संबंध? मुख्यमंत्र्यांना आताच फोन लावा. त्याला इथूनच आऊट करतो, असा आक्रमक पवित्रा जरांगे यांनी घेतला.यावेळी मराठा बांधवांनी जरांगे यांना शांत केलं. तसेच त्यांना उपचार घेण्याची विनंती देखील केली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई आणि दीपक केसरकर यांच्यासोबत फोनवरूच चर्चा केली. मराठ्यांची वाहने अडवणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फे करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.
लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरु केलं आहे. तर मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे उपोषण करत आहेत. तर वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत. दोन्ही समाजाचे कार्यकर्ते जमले, त्यांनी घोषणाबाजी केली त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. वडीगोद्रीमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.