मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. जुळून येती रेशीमगाठी मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरांत पोहचली. सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमीच सक्रिय असते. निरनिराळे व्हिडीओ व फोटो पोस्ट करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्राजक्ता तिच्या नागपूर दौऱ्यामुळे चर्चेत आली होती. या दौऱ्यादरम्यान तिने काही राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान प्राजक्ता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या राजकीय प्रवेशाबाबत भाष्य केले आहे.
काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. गेल्यावर्षी २४ ऑक्टोबरला नागपूरच्या रेशीमबाग मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला प्राजक्ताने हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर प्राजक्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अशा राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची भेटही घेतली होती. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
प्राजक्ता पुढे म्हणाली, “माझं एक मत आहे ते म्हणजे, एक तर तुम्ही पॉवरफूल लोकांच्या संपर्कात राहा, नाहीतर तुम्ही स्वत: पॉवरफूल बना. मी खूप भावनिक आहे, त्यामुळे राजकारणात प्रवेश करणं हा माझा विचार नाही. कदाचित मला हे जमणारही नाही. पुढचं मी काहीही सांगू शकत नाही, पण राजकारणात जाण्याचा माझा विचार नाही.”