‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. पण आता प्राजक्ता तिच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
“महिला व बाल विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य की आयुष्यभरासाठी मैत्रीण?, मा. आदिती ताई तटकरे. स्वतः महिला व नाव “आदिती”चं असल्याने महिलांचे प्रश्न जाणून स्त्री शक्तीस आधार देणारं खंबीर, झंझावाती नेतृत्व त्यांच्यात आहेच. त्याबरोबरीने दिव्यदृष्टी, आठवणी, दयाळू स्वभाव आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता हे त्यांच्यातील गुण मला खूप प्रेरणा देतात. त्यांना जवळून भेटता आलं, याचा आनंद आहे.
काल रात्री आम्ही मज्जा केली. आमचे विचार खूप जुळतात. आपण अनेकदा भेटलं पाहिजे आणि महिला सुरक्षा, सक्षमीकरणासाठी एकत्र कामही केलं पाहिजे. आपण करावं का?” असा प्रश्न प्राजक्ता माळीने विचारला आहे. त्यात तिने आदिती तटकरे यांना टॅगही केले आहे.