राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा दिल्यानंतर नवा वाद उभा राहिला होता. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही सुरक्षा दिल्याने माझी हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे का? अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली होती. तसेच ही केंद्रीय सुरक्षा शरद पवार यांनी नाकारल्याचेही सांगण्यात येत होते. अशातच आता सुरक्षा घेण्याआधी शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित काही अटी ठेवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर आता या बैठकीनंतर शरद पवार यांच्याकडून काही अटींचे पत्र केंद्र सरकारला पाठवण्यात आले आहे, त्या मान्य झाल्यानंतरच सुरक्षा घेण्यात येईल, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.या अटींमध्ये केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार अशी पहिली अट शरद पवारांनी ठेवली आहे. तसेच कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल. याशिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसेल, यासह काही अटी शर्थींचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आले आहे. या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे.
दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील तीन प्रमुख नेत्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली होती. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आणि शरद पवार यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. ही एक प्रकारची गुप्तहेरगिरी करण्याची पद्धत असल्याचे सांगत शरद पवारांनी केंद्रास नकार दिला होता. त्यानंतर आता पवारांनी सरकारला ही सुरक्षा स्वीकारण्याबाबत काही अटींचे पत्र पाठविले आहे.