निवडणूक नियमांचा अभ्यास करत संवेदनशीलतेने काम करा-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी
अहमदनगर दि.१४- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीचा सूक्ष्म अभ्यास करत अत्यंत संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले.
श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित श्रीरामपूर विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी किरण पाटील-सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे, तहसीलदार मिलिंद वाघ, परिवहन अधिकारी जयंत जोशी, गटविकास अधिकारी प्रवीण शिनारे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.
डॉ.कुलकर्णी म्हणाले,
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अत्यंत आव्हानात्मक असे काम आहे. निवडणुकीच्या कामामध्ये चुका होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणुकीचे काम पारदर्शकपणे व सुरळीतपणे व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने नियमावली दिली आहे. त्या नियमावलीनुसारच प्रत्येकाने काम करावे.
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समन्वयक अधिकारी, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणातून निवडणुकीशी संबंधित सर्व नियम त्यांना अवगत करून द्यावेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना काही शंका असतील तर त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निरसन करून घ्यावे. प्रत्येकाने सजग राहून आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
डॉ. कुलकर्णी यांनी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मॉकपोल, टपाली मतपत्रिका, ईएमएस, विविध पथकांची स्थापना आदी बाबींचा आढावा घेतला.
उपविभागीय अधिकारी श्री.पाटील-सावंत म्हणाले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ३११ मतदान केंद्र असून ३ लाख ५ हजार मतदार आहेत. मतदारसंख्येत वाढ होण्याच्यादृष्टीने स्वीपमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने रूटप्लॅन, कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात आला आहे. समन्वयक व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. शिवपुंजे यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच निवडणूक शांततेत व सुरळीत होण्यासाठी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.
बैठकीस निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. किरण कुलकर्णी यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय इमारतीमधील स्ट्रॉंगरूमला अतिरिक्त मुख निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचाही त्यांनी आढावा घेतला.