राज्यात विधानसभा निवडणूकांसाठी बहुतांश पक्षांकडून हळूहळू उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एमआयएमने एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता विधानसभेसाठी 5 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यात इम्तियाज जलील यांच्यासह आणखी ४ उमेदवार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अससुद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घोषणा केली आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली होती. बीड, परळीसह इतर जिल्ह्यांमधून MIM च्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. संभाव्य उमेदवारांच्या याद्या सुरु केल्या होत्या. दरम्यान, MIM ने महाविकास आघाडीला सामील होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. सप्टेंबर मध्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर MIM पक्षाची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली. यात MIM चे अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी यांनी एकूण 5 उमेदवारांची घोषणा केली असून उरलेल्या उमेदवारांची यादी नंतर जाहीर करणार असल्याचं सांगितलंय. या पाच उमेदवारांमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्यासह धुळ्यातून फारूक शाह , मालेगावचे मुक्ती इस्माईल, मुंबईतून रईस लष्करीया, सोलापूरचे फारूक शाब्दी यांच्या नावाची घोषणा केली आहे.