Saturday, December 7, 2024

अहमदनगर जिल्ह्यातील मिनीसेविका होणार अंगणवाडी सेविका, मदतनीसांची पदे भरणार

जिल्ह्यात ८१४ मिनी अंगणवाड्यांना अंगणवाड्यांचा दर्जा
अहमदनगर : एकात्मिक बाल विकास विभागाच्या वतीने राज्यातील १३ हजार मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होऊन त्यांना अंगणवाड्यांचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील ८१४ मिनी अंगणवाड्यांचे नियमित अंगणवाडीत रुपांतर होणार आहे. येथे कार्यरत मिनी अंगणवाडीसेविकांना वाढीव मानधनासह नियमित अंंगणवाडीसेविकेचा दर्जा मिळणार आहे.

मागील महिन्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली होती. गेल्या ४ डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शिंदे सरकारने हा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील १३ हजार ११ मिनी अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्या पूर्णवेळ अंगणवाडी सेविका होणार आहेत. त्याचबरोबर १३ हजार ११ अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत. त्यासाठी या नव्या अंगणवाड्यांना प्रशासकीय व इतर खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या १३ हजार ११पैकी अहमदनगर जिल्ह्यात ८१४ मिनी अंगणवाड्यांचा समावेश असून, त्यांचे रुपांतरही नियमित अंगणवाडीत होणार आहे.
४ डिसेंबरपासून राज्यातील अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. या संपात मिनी अंगणवाड्यांचे रुपांतर नियमित अंगणवाडीत करण्याची मागणी संप करणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या वतीने करण्यात आली होती. ती मागणी आता शासनाने मान्य केली आहे. परंतु, वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडीसेविकांचा संप सुरूच आहे. त्यावर केव्हा तोडगा निघेल, हे अद्याप अस्पष्ट आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार ५६१ नियमित अंगणवाड्या, तर ८१४ मिनी अंगणवाड्या कार्यरत आहेत. आता ८१४ मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन होणार असल्याने जिल्ह्यात एकूण नियमित अंगणवाड्यांची संख्या ५ हजार ३७५ होणार आहे. या सर्वांना प्रचलित नियमानुसार साडीसाठी १ हजार रुपये मानधन मिळणार आहे. याशिवाय अंगणवाडीत फर्निचरसाठी पाच वर्षातून एकदा १० हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित अंगणवाडी सेविका म्हणून दर्जा मिळाल्यानंतर तेथे नव्याने मदतनीस यांचे पदही मंजूर करण्यात आले आहे. ते पद भरण्यासाठी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यास महिला बालकल्याण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात आणखी ८१४ मदतनिसांची पदे भरली जातील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles