ढवळपुरी विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप
विभागीय स्तरावर लेखा परीक्षण करुन चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ढवळपुरी (ता. पारनेर) विविध सेवा सहकारी संस्थेत शासकीय रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने विभागीय स्तरावर लेखा परीक्षण करुन चेअरमन व सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले असून, 21 दिवसात कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
ढवळपुरी (ता. पारनेर) विविध सेवा सहकारी संस्थेत चेअरमन व सचिव यांनी संगनमत करून बोगस रकमेची बिले दाखवून मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे. संबंधित अपहार लेखापरीक्षक एन.एस. दळवी यांच्या अहवालातून दिसून येत आहे. सहकार अधिनियमाची पायमल्ली करून ढवळपुरी विविध कार्यकारी सेवा संस्थेत चेअरमन यांनी पदाचा दुरुपयोग करून स्वस्त धान्य दुकाने स्वतः चालवत असून, त्या दुकानामध्ये स्वतःच्या मुलाला सेल्समन दाखवून अनेक दिवसापासून त्याच्या नावे पगार काढले आहेत. मापाडी सुद्धा त्यांचाच घरातील दाखवून त्याच्या नावेही पगार काढण्यात आले आहे. सेवा संस्थेचे चेअरमन असल्याने घरातील कुठल्याही व्यक्तीस संस्थेस कामावर ठेवता येत नसतानाही पदाचा दुरुपयोग करण्यात आला आहे.
अनेक दिवसांपासून स्वस्त धान्य दुकान दलित वस्तीचे समाज मंदिरात सुरू असून, त्या दुकानाचे भाडेपोटी बिले काढण्यात आली आहे. सदरची भाडे रक्कम ही ग्रामपंचायत निधीमध्ये जमा करायला पाहिजे होती, मात्र आर्थिक हितासाठी चेअरमन व सचिव यांनी संगनमत करून या रकमा काढून घेतल्या आहेत. मासिक मीटिंग सदस्यांच्या सह्या खोट्या घेण्यात आल्या आहेत. वार्षिक मीटिंगलाही अनेकांच्या सह्या डुप्लिकेट मारण्याची शक्यता आहे. याप्रकरणी चौकशी होण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रोसिडिंग ठरावानुसार वॉल कंपाऊंडचा ठराव हा 2 लाख 95 हजार चा करण्यात आला होता. चेअरमन, सचिव व ठेकेदाराने संगणमत करून लेखापरीक्षक यांच्या अहवालानुसार त्या वॉल कंपाऊंडच्या नावे 1 एप्रिल 2022 रोजी 12 लाख 10 हजार नावे दाखवण्यात येऊन ते काढून रकमेचा अपहार केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
वार्षिक सभेतही प्रत्यक्ष कमी खर्च करून त्या रकमेतही अपहार झाला आहे व इतर वस्तू खरेदीवरही मोठ्या रकमा खर्च करण्यात आलेल्या असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार शासकीय रकमेचा अपहार केल्याने सचिव, चेअरमन यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
नगरमधील ‘या’ सहकारी सेवा संस्थेत अपहार! अध्यक्षासह सचिवावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
- Advertisement -