अहमदनगर (प्रतिनिधी)- माळीवाडा बसस्थानकासमोर अत्यंत गजबजलेले ठिकाणी असणार्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमध्ये असणार्या एका विभागातील महिला कर्मचार्याला गुरुवारी दुपारी एका मद्यधंदू व्यक्तींने छेडत तिच्याशी गैरवर्तन केले. अखेर संबंधीत महिलेने आरडाओरड केल्यानंतर अन्य महिला कर्मचार्यांसह पुरूष कर्मचारी याठिकाणी संबंधीत महिलेच्या कर्मचार्याच्या मदतीला धावले. त्यानंतर मदिरा प्राशन केलेल्या ‘त्या’ व्यक्तीला महिला कर्मचार्यांसह पुरूष कर्मचार्यांनी चांगलेच बदाडले. अखेर ‘त्या’ मद्यधुंद व्यक्तीची पत्नी हिने गयावया करत त्याची सुटका करून घेतली. मात्र, या गंभीर प्रकरणाबाबत जिल्हा परिषद प्रशासन अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयाचा परिसर हा नगर शहरातील माळीवाडा एसटी स्टँडसमोरच आहे. हा परिसर नेहमी गजबजलेला असतो. या ठिकाणी येणारे जाणार्यांची मोठी वर्दळ असते. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात नवीन इमारती शेजारी जुनी इमारत आहे. याठिकाणी एटीएम मशीन असून याठिकाणी पैसे काढण्यासाठी येणार्यांची नेहमी गर्दी असते. या ठिकाणी असणार्या जुन्या इमारतीमध्ये एका उपविभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयातील महिला कर्मचार्यांसाठी तळमजल्यावर स्वच्छतागृह असून उपविभागातील एक महिला कर्मचारी गुरूवारी दुपारी स्वच्छतागृहात गेली होती. त्याठिकाणी आलेल्या मद्यधुंद व्यक्तीने संबंधीत महिलेची छेड काढली. अखेर या महिलेने मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर अन्य महिला आणि पुरूष कर्मचारी मदतीसाठी धावून आले. तोपर्यंत छेड काढणारा गायब झाला होता. दरम्यान, जिल्हा परिषदेतील सीसीटीव्हीच्या आधारे छेड काढणार्याला एसटी स्टॅड परिसरातून शोधू आणण्यात आले. त्याठिकाणी उपस्थितीत महिला कर्मचार्यांनी आधी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर काही पुरूष कर्मचार्यांनी देखील आपला हात साफ करून घेतला, असल्याची माहिती याठिकाणी असणार्या प्रत्यक्षदर्शीनी दिली.
दरम्यान, त्या मद्यधुंद कर्मचार्यांची पत्नी त्याठिकाणी आली आणि तिने उपस्थिती सर्वांची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याची मागणी केली. अर्धा ते पाऊण तासाच्या गोंधळानंतर या प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान, छेड काढलेली महिला कर्मचारी झालेल्या प्रकारावर मुळे भयभित झालेल्या आहेत. या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे चौकशी केली असता असा कोणताच प्रकार त्यांच्या कानावर आला नसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आवारात घडलेल्या महिला कर्मचार्यांच्या छेडछाडीकडे प्रशासन कसे दुर्लक्ष करू शकता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आधीच मागील पंधारवाड्यात लाचेच्या प्रकरणामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची आब्रु गेली असून त्यात आता महिला कर्मचार्यांच्या छेडछाडीच्या घटनेमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात कोणतीच तक्रार देण्यात आलेली नाही..
सुट्टीच्या दिवशी टाळखोर आवारात
माळीवाडा भागातील अनेक टवाळखोरांचा जिल्हा परिषदेच्या आवारात दिवसभर मुक्कामच असतो. विशेष करून सायंकाळी सहानंतर आणि सुट्टीच्या दिवशी हे महाशय जिल्हा परिषदेच्या आवारात घुसताच कसे असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी झालेल्या आहेत. मात्र, उपयोग झालेला नसल्याचे काही कर्मचार्यांनी सांगितले.
………………….
अहमदनगर जिल्हा परिषदेत महिला कर्मचार्याशी गैरवर्तन, संतप्त महिला कर्मचार्यांनी…
- Advertisement -