विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडत आहे.
आज शिवेसनेचे (शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांनी आमदारीकीची शपथ घेतली. मात्र, आमदारीकीची शपथ घेतल्यानंतर आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण आमदारीकीची शपथ घेताना त्यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही. त्यांचा हा शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. मात्र, यानंतर आमश्या पाडवी यांनी आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘शपथ घेताना वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) असल्यामुळे अडचण आली’, असं कारण आमश्या पाडवी यांनी साम टिव्ही या वृत्तवाहीनीशी प्रतिक्रिया देताना सागितलं आहे.
“माझं शिक्षण कमी आहे, त्यामुळे विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोलत होते. त्यानंतर मी बोलत होतो. मात्र, त्यांनी वाक्य जास्त लांब (मोठं वाक्य) वाचलं. त्यामुळे अडचण आली. कारण माझ्या संपूर्ण परिवारामध्ये चौथी पर्यंत शिकणारा मी पहिला व्यक्ती आहे. तरीही मी सरपंच झालो, पंचायत समीतीचा सभापती झालो आणि दोन वेळा आमदार देखील झालो. कारण मी लोकांमध्ये राहणारा एक व्यक्ती आहे, त्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं आहे.