आदित्य ठाकरे यांनी त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणून शिवसेना संपवायला लावली आणि ते काँग्रेससोबत गेले. त्यांच्यामुळे युती तुटली, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.
शालेय गणवेशात दीपक केसरकर यांनी घोटाळा केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर दणकून टीका केली. ते म्हणाले,‘स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात अवाक्षर काढणाऱ्या काँग्रेसच्या तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांना आम्ही मुंबईत येऊ दिले नव्हते ही शिवसेनेची ताकद होती. त्याच काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला. हे सर्व आदित्य ठाकरे यांच्या पोरकटपणामुळे घडले आहे. त्यांनी जनतेमध्ये जायला शकले पाहिजे. त्यांनी स्वतःमध्ये सुधार करावा असा वडील म्हणून मी त्यांना सल्ला देतो.’






