विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली. ते म्हणाले की, सत्तासंघर्षाचा निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांची ‘नार्को टेस्ट’ केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास असून आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी असल्याचे नितीन देशमुख म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते.