संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या निकालाचे वाचन करत एकनाथ शिंदेचा गटच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. या धक्कादायक निकालावर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना सर्वच आमदार पात्र कसे काय? हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला आहे.
“विधानसभा अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा निकाल अपेक्षितच होता परंतु सर्वच आमदार पात्र कसे काय ? हा संशोधनाचा विषय असून पुढील दोन दिवसात याचे सविस्तर विश्लेषण समजून येईल,” अशी प्रतिक्रिया तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर दिली आहे.
“नेमके आमदार कोणाकडे जास्त होते ? पक्ष साधारण कोणाकडे जायला हवा, नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर हा निकाल अपेक्षितच होता. एक बाब मला अजूनही समजली नाही. जरा विश्लेषण करावे लागेल की सगळेच पात्र कसे आहेत, हे थोडे समजून घ्यावे लागेल. निकाल पूर्ण समजणे शक्य झाले नाही, येत्या एक ते दोन दिवसा मध्ये त्याची स्पष्टता येईल,” असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.