शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला आहे. सर्वकाही आधीपासूनच फिक्स झालं आहे, त्यामुळे आजच्या निकालाची केवळ औपचारिकताच आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १२ जानेवारीला महाराष्ट्रात रोड शो करणार आहे. तर आमदार अपात्रतेचा निकाल असल्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोस दौऱ्यावर जाणार आहे. याचाच अर्थ असा आहे की, दोघांनाही मॅच फिक्सिंगबाबत पूर्ण माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहे. याआधी संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी राऊत म्हणाले, “जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग हा शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतोय त्याच्यावर चर्चा होतेय”.
“दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर घटना बाह्य सरकार काम करतंय, जे निर्णय घेतले जात आहेत, त्याच्यामुळे देशांमध्ये आणि महाराष्ट्राची संविधान पायदळी तुडवला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा विधानसभेचे यांनी सुनावणी देण्यास चालढकल केले “विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कामांमध्ये राजकीय रंग दाखवला. प्रोटोकॉल असं सांगतो की, एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाही. पण हे मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांच्या कॅबिंमध्ये जातात, या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या आहेत”, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
“प्रधानमंत्री रोड शोसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. तर मुख्यमंत्री दावोसला जात आहेत कारण त्यांना निर्णय माहित आहे, की आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार. याचा अर्थ घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे निर्णय दिल्लीतून झालेला आहे फक्त शिक्का मारणं बाकी आहे”, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.