अजित पवार गटात गेलेले पारनेरचे आमदार नीलेश लंके आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
रविवारी पुण्यात एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष, म्हणजे लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामांचा गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला आणि तोही जयंत पाटलांच्या हस्ते.
या वेळी बोलताना जयंत पाटील यांनी आपल्या मार्मिक शैलीत लंकेची राजकीय फिरकी घेतली. गोरक्षनाथांचा आश्रम आमच्या शिराळयाला आहे. माझ्या मतदारसंघात किल्ले मच्छिंद्रगड असून तिथे फार सुंदर मंदिर आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याअगोदर या गडावर येऊन गेलेले आहेत. त्या मुळे लंके साहेब तुम्हालाही गडावर यायचे असेल तर तुम्ही या ! असे पाटील यांनी सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. कोरोना महामारीमध्ये लंके यांनी शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात १ हजार १०० बेडची व्यवस्था करीत रुग्णांना आधार देऊन त्यांच्या मनातील भीती दुर करण्याचे महत्त्वाचे काम केल्याने हजारो कोरोना रुग्णांना जीवदान मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले.