नगर तालुका- त्यांना आता असे वाटू लागले आहे की राज्यच आपण चालवतोय की काय ! प्रशासनास धाक दाखवायचा. प्रशासनाचे लोक बळंच दडपशाही करून उभे करायचे. आणि सांगायचे की सांगा लोकांना आमची कामगिरी ! तुमचे काम आहे ना, तुम्ही मंजुर केले आहे ना, तुम्ही नारळ फोडा, आम्ही येणारही नाही. निलेश लंके कधी दुसऱ्याच्या झेंडयावर पंढरपूरची स्वप्ने पाहत नाही. मी काम मंजुर केलंय तर मीच नारळ फोडणार. तुम्ही मंजुर केले तर तुम्ही फोडा. असे सांगत आमदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांचे नाव न घेता पुन्हा एकदा जोरदार निशाना साधला.
नगर तालुक्यातील शिंगवे नाईक व नांदगांव येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आ. लंके यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच सखाराम सरक, सेवा संस्थेचे चेअरमन नंदकुमार सोनवणे, सरपंच बाबा काळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, माझं जाहिर आव्हान आहे. तुम्ही तुमच्या साडेचार वर्षातील कामाचा लेखाजोखा समोरासमोर घेउन बसा कागदोपत्री. मी माझ्या कामाचा लेखाजोखा घेऊन समोरासमोर बसतो. काहीतरी बातम्या छापून आणायच्या, जिल्हा परिषदेच्या प्रशासकिय मंजुऱ्या घेउन जायच्या आणि सांगायचे हे काम तुझ्या गावचं. जिल्हा परिषदेचा आणि तुमचा काय संबंध ? जिल्हा परिषदेशी प्रताप पाटलांचा, बाळासाहेब हराळांचा, संदेश कार्ले, गोविंद मोकाटे यांचा संबंध आहे. तुमचा काडीचाही सबंध नाही तरीही सांगायचे आम्ही काम केले असे सांगत आ. लंके यांनी विखे पिता पुत्रांवर त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेवरून आ. लंके यांनी खा. डॉ. विखे यांचे नाव न घेता चांगलेच सुनावले. मधल्या काळात कुठेतरी कामाला सुरूवात झाली, मात्र ते कामही बंद झाले. तुम्ही ज्या रस्त्याने घरी जाता तो रस्ता तरी करा ना आगोदर ! मग दुसऱ्यांना उपदेशाचे डोस पाजा ! स्वतः काहीच करायचे नाही. लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण !अशी त्यांची अवस्था असल्याचे लंके म्हणाले.