नगर : विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन २०१८-१९ साठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे. सन २०२३- २४ या वर्षात आमदार प्राजक्त तनपुरे यांना उत्कृष्ट भाषणासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. नगर जिल्ह्यातील केवळ दोनच विधानसभा सदस्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना आ. तनपुरे यांनी म्हटले आहे की,
राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने २०२३-२४ सालासाठी विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली. ही बातमी आपल्यासोबत शेअर करीत असताना मला अतिशय आनंद होत आहे.
राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील नागरीकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला विधानसभेत निवडून पाठविले. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे.
विधिमंडळात जनहिताचे मुद्दे मांडताना शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे प्रेरणास्थान आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. सुप्रियाताई सुळे यांचे आशीर्वाद व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन तसेच माझ्या मतदारसंघातील जनता यांच्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.
म्हणूनच हा बहुमान मी माझ्या मतदारसंघातील जनता, आई-वडील तसेच वडीलधाऱ्या नेतृत्वाला कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. जनहिताचे काम करण्यासाठी मिळालेली ही उर्जा आपल्या सर्वांच्या साथीने अक्षय्य राहील हा विश्वास आहे.
धन्यवाद🙏🏼