उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील दुधी मतदारसंघातील भाजप आमदार रामदुलार गोंड यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने भाजप आमदार रामदुलार गोंड यांना 25 वर्षांचा तुरुंगवास आणि १० लाखांचा दंड ठोठावला आहे.
दंडाची रक्कम पीडितेला मिळणार आहे. सोनभद्रच्या खासदार-आमदार न्यायालयाने अलवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2014 मध्ये महापौरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ वर्षांच्या दीर्घ सुनावणीनंतर हा निकाल आला आहे.
आठ वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्यायालयाचे न्यायाधीश एहसानुल्ला खान यांनी दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. आदेशानंतर रामदुलार गोंड यांचे आमदारकी रद्द होईल, असं बोललं जात आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे आमदारांच्या वकिलांनी सांगितले आहे.