नगर: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटी नंतर नगर शहराला मंत्री पद मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे. माजी आमदार अरूणकाका जगताप यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. अजित पवारांनी सहकारी आमदारांसह राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्री पदाची शपथ घेतली. नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवारांना साथ दिली. नगर जिल्ह्यातील राजकारण पाहता जिल्ह्याला मंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. आ. जगताप हे सलग दोन वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्री मंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल अशी चर्चा होत आहे. आ. जगताप यांचे समर्थकही यावेळी लाल दिवा मिळेलच असा विश्वास व्यक्त करीत आहेत.