आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने मैदानात उतरणार असून कोणत्याही परिस्थितीत लोक सत्तेत बसवायचे आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. तसेच युती आघाडी होईल अशी वाट बघू नका असे म्हणत त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईमध्ये झालेल्या मनसेच्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये ते बोलत होते.
“काल मी यादी पाहत होतो विधानसभेची. कोण कुठल्या पक्षात आहे काही कळत नाही. येणाऱ्या निवडणुकीत या पक्षांमध्ये जे घमासान असणार ते ना भूतो असेल. आपल्या मनसेचे लोक सत्तेत काहीही करून बसवायचे आहेत. काही लोक हसतील पण घडणार म्हणजे घडणार. युती होईल का आघाडी होईल का असा काही विचार करू नका. आपण २२५ जागा लढवणार आहोत,” असं राज ठाकरे म्हणाले.
“तुमचा सर्वे होणार जे काही चिन्ह दिसतील आणि सर्वे होतील ते पाहून तिकीट दिले जाणार आहे. १ तारखेपासून मी महाराष्ट्र दौरा करत आहे. मी दौऱ्यात काही लोकांना भेटेन. माझी भेटी, तुम्ही पण करून द्या, तुम्ही पक्षाच्या आणि निवडणुकीच्या तयारी ला लागा,” असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.”आपल्या पक्षातील काही लोक इतर पक्षात चालले आहे. मी स्वतः त्यांना लाल कार्पेट घालतो.ज्यांना जायचे जा, वाटोळं करून घ्या. लोकसभेत कुठे घुसले माहीत आहे ना?” असे म्हणत राज ठाकरे यांनी पक्षातील आयाराम-गयारामांनाही थेट इशारा दिला. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधला.