मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीकडे कोणत्याही जागांची मागणी केलेली नसून विधानसभेच्या किमान २००- २२५ जागा लढविण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची घोषणा करीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी केली. तसेच जागावाटपासाठी कोणाच्याही दारात जाणार नाही, असेही महायुतीच्या नेत्यांना सुनावले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज रंगशारदा सभागृहात पार पडला. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा मनोदय व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण आता विधानसभेसाठी जागावाटपावर महायुतीच्या तीन पक्षांमध्ये काही ठरलेले नाही. मग कोणाकडे जागा मागणार. गेल्या दोन दिवसांपासून कुणीतरी मनसेने विधानसभेसाठी २० जागा मागितल्याची पुडी सोडली होती. पण विधानसभेच्या जागा मागण्यासाठी कुणाच्या दारात जाणार नाही तर आपणच विधानसभेच्या २०० ते २२५ जागा लढवत आहोत. त्यासाठी मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्हयात पथक पाठविण्यात येणार असून महिनाभरात त्यांचा अहवाल येईल. त्यानंतर कोणत्या जागा लढवायच्या आणि कोणत्या जागी कोण उमेदवार द्यायचा याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तोवर सर्व २८८ मतदारसंघांत निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
शिवसेनेतून ४० आमदार फुटले तोवर ठीक होते. पण बाळासाहेबांचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकांना पटले नाही. त्याचा फटका बसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीतही तुमच्या भांडणात बाळासाहेबांना आणू नका, असे आपण शहा तसेच राज्यातील भाजप नेत्यांना स्पष्टपणे सांगितले होते. चिन्ह आणि पक्षाचे नाव काढून घेतल्याचा फटका महायुतीला बसल्याचे निरीक्षणही ठाकरे यांनी नोंदविले.