मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलभिडूला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, राज्यात आधीच ट्रिपल इंजिन सरकार असतानाही त्यांना मनसेच्या चौथ्या इंजिनाची गरज का भासली? यावर राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. राज ठाकरे म्हणाले, त्यांना माझ्याकडून इंजिन नव्हे, तर कोळसा हवा असेल.
ठाकरे यांच्या या उत्तरानंतर त्यांना विचारण्यात आलं की, चार इंजिनांची रेल्वेगाडी तयार झाली आहे. या गाडीला प्रवाशांसाठी डबे लागणार आहेत की फक्त इंजिनच असतील. त्यावर राज ठाकरे म्हणाले, मी आत्ता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिलं आहे. हा विषय लोकसभेच्या दृष्टीने मोदींना पाठिंबा देण्याचा आहे. मी मोदींवर आणि भाजपावर प्रचंड टीका देखील केली आहे आणि त्याची कारणं देखील मी भर सभेत सांगितली आहेत. गुढीपाडव्याच्या सभेतही मी त्याचा पुनरुच्चार केला होता. मी ज्या प्रकारे लोकांसमोर माझी मतं मांडली तशी मतं इतर कुठल्याही पक्षांनी कधी मांडली नाहीत. आज जे लोक मोदींचा किंवा भाजपाचा विरोध करत आहेत त्यांच्यापैकी कुठल्या नेत्याने किंवा पक्षाने माझ्यासारख्या भूमिका घेतल्या नाहीत. हे जे लोक (महाविकास आघाडी) आज मोदींविरोधात बोलतात ते केवळ थातुर-मातुर बोलतात, माझ्यासारख्या ठाम भूमिका कोणी मांडल्या नाहीत. त्यांना काही मिळालं नाही म्हणून विरोध करतात. यांना (उद्धव ठाकरे) जर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर आज या लोकांनी भाजपाचा आणि मोदींचा विरोध केला असता का? यांना सत्ता मिळाली नाही म्हणून हे सगळं चाललं आहे.