मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे विश्वासू अभिजीत पानसे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या कार्यालयात आले. यानंतर ते मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांकडे आल्याच्या चर्चांना उधाण आलं. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर तर्कवितर्क लावले जात आहेत. अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अभिजीत पानसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. अभिजीत पानसे म्हणाले, “नाही. मनसे पक्षात मी इतक्या मोठ्या स्थानावर नाही. मी राज ठाकरेंचा कट्टर सैनिक आहे. त्यामुळे तशी वेळ येणार असेल तर मला माहिती नाही. युतीवर चर्चा करायची असेल, तर स्वतः राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यावर बोलतील.” “मी माझ्या वैयक्तिक कामासाठी संजय राऊतांना भेटण्यासाठी सामनाच्या कार्यालयात आलो होतो. त्याचे वेगळे अर्थ लावू नका. या भेटीत राजकीय चर्चांचा काहीही संबंध नाही. माझे संजय राऊतांशी फार जुने संबंध आहेत. मला संजय राऊतांनीच राजकारणात आणलं होतं. त्यामुळे मला त्यांना काही कामानिमित्त भेटायचं होतं,” असं मत अभिजीत पानसे यांनी व्यक्त केलं.
राज ठाकरेंचे विश्वासू नेते संजय राऊतांना भेटले, दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा
- Advertisement -