वर्षभरापूर्वी बांधलेल्या नव्या संसद भवनातील खासदारांच्या एका लॉबीत पावसामध्ये गळती लागल्याचं समोर आलं होतं. खासदारांच्या लॉबीला लागलेल्या गळतीनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. यानंतर आता संसद भवनात खासदारांच्या लॉबीमध्ये माकड फिरत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भातील व्हिडीओ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवीन संसदेत खासदारांच्या कॉरिडॉरमध्ये आणि लॉबीत एक माकड फिरताना दिसले. मात्र, हे माकड आतामध्ये कसे गेले? असा सवाल आता अनेकांनी विचारला आहे. दरम्यान, नवीन संसदेत जुन्या संसदेप्रमाणे खुले कॉरिडॉर नसल्यामुळे इमारतीच्या एका दरवाजामधून माकड आत गेलं असावं, असा अदांज लावला जात आहे. हे माकड कॉरिडॉरमध्ये आणि लॉबीत फिरताना दिसल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढले.संसद भवनामधील खासदार लॉबीमधील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड सोफ्यावर बसलेलं दिसत आहे. एवढंच नाही तर लॉबीच्या आतमध्ये माकड उड्या मारतानाही दिसलं. तर त्याच लॉबीमध्ये काही लोक शेजारच्या सोफ्यावर बसलेलेही दिसले आहेत. यावेळी तेथे बसलेल्या एका व्यक्तीने या माकडाचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. या माकडाने कोणतंही नुकसान केलं नसल्याचं सांगितलं जात आहे. खासदार लॉबीत फिरत असलेल्या या माकडाच्या व्हिडिओबाबत अद्याप कोणी अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.