मंगळवारी ४ जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानंतर ६ जून रोजी पुण्यात मान्सून पोहचणार आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर आधी कोकणात येतो. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवस लागतात. म्हणजेच आठ ते दहा तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांत मान्सून दाखल होणार आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पुणे हवामान विभागाचे निवृत्त हवामानशास्त्र डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे की, जून महिना सुरु झाल्यामुळे या महिन्यात जो पाऊस पडेल तो मान्सूनचा समजला जाईल. सध्या पश्चिम बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मान्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यात ३ जून रोजी, तळ कोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.