अहमदनगर-आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात सुमारे साडे तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हा बाहेरून अतिरिक्त कुमक मागवली आहे.
गणेशोत्सवाला सुरूवात झाली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे. उत्सव काळात मंडळाकडून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुढील 10 दिवस मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केल्या जाणार्या गणेशोत्सवाला गालबोट लागू नये, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसांच्या मदतीला जिल्हा बाहेरून अतिरिक्त कुमक मागवली आहे. अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक 2, पोलीस उपअधीक्षक 7, पोलीस निरीक्षक 28, सहा. पोलीस निरीक्षक 33, पोलीस उपनिरीक्षक 52, पोलीस अंमलदार 1725, युआरटीचे 2 पथके, आरसीपीचे 3 पथके व 10 ट्रॅकिंग फोर्स याशिवाय 1650 होमगार्ड असा जिल्ह्यातील बंदोबस्त असणार आहे.
जिल्ह्याबाहेरून आलेल्या बंदोबस्तामध्ये पोलीस उपअधीक्षक एक, पोलीस निरीक्षक 7, पोलीस उपनिरीक्षक 8, परि.पोलीस उपनिरीक्षक 150, महिला पोलीस अंमलदार 100, एसआरपीची 1 कंपनी, रॅपिड ऍक्शन फोर्स दाखल झाले आहे. पुढील 10 दिवस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस ठाणे हद्दीत गस्त वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व प्रभारी अधिकार्यांना पोलीस अधीक्षक ओला यांनी सूचना दिल्या आहेत. नागरिकांनीही कायद्याचे पालन करून उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन अधीक्षक ओला यांनी केले आहे.
उत्सव शांततेत पार पाडावा या उद्देशाने जिल्ह्यातील समाजकंटकांवर विविध स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 899 जणांवर गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत प्रवेशबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फौजदारी दंड संहिता 149 नुसार 2069 प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. जातीय तेढ निर्माण करण्याच्या संशयावरून 310 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय गुन्हेगारी टोळ्या हद्दपार करण्यात आल्या असून तिघांवर ‘एमपीडीए’ कारवाई करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी ‘दामिनी’ पथके तैनात केले आहे. अतिरेकी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी बॉम्बशोधक पथके व श्वानपथके असून अचानक गर्दीच्या ठिकाणी जाऊन ते तपासणी करणार आहे. सोशल मीडियावर तेढ निर्माण होईल असे मेसेज व्हायरल केले जातात, अशा व्हायरल मेसेजवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर पोलीस दल मोठ्या प्रमाणात सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, व्हॉट्सअप ग्रुपवर तेढ निर्माण होईल, असे मेसेज व्हायरल केल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.