अहमदनगर-आईच्या मित्रानेच अल्पवयीन मुलीसोबत (वय 16) लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना नगर शहरात घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून वैजनाथ बबन झांजे (मूळ रा. वाहिरा, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 मे रोजी फिर्यादी, तिची आई व आईचा मित्र वैजनाथ असे तिघे घरी असताना फिर्यादीची आई सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मार्केटमध्ये भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादी व वैजनाथ घरी होते.
मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत वैजनाथ याने फिर्यादीसोबत अश्लिल चाळे करण्यास सुरूवात केली. फिर्यादीने त्याला विरोध केला असता त्याने दम दिला. फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत ‘जर तु तुझ्या मम्मीला सांगितले तर ती माझ्याशी भांडेल आणि मग मी तुम्हाला दोघींना मारून टाकीन’ अशी धमकी दिली. फिर्यादी घाबरलेली असल्याने तिने आईला सांगितले नाही. परंतु तिने हा सर्व प्रकार रविवारी (22 सप्टेंबर) तिच्या आईला सांगितला. त्यांनी दोघींनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वैजनाथ झांजे विरोधात विनयभंग, पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.