‘इंडिया’ आघाडीच्या १४६ खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधीपक्षांनी देशव्यापी निदर्शने केली. ‘लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी उडी घेतल्यावर स्वत:ला देशभक्त म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या खासदारांनी घाबरून धूम ठोकली’, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केली.
संसदेतील सुरक्षाभंगाच्या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात निवेदन देण्याच्या विरोधकांच्या मागणीला केंद्र सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे संतापलेल्या इंडियाच्या खासदारांनी दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ केला होता. त्यामुळे लोकसभेतील १०० तर राज्यसभेतील ४६ खासदारांना निलंबित करण्यात आले. ‘सुरक्षाभंगाच्या मुद्दय़ावर, दोन तरुण सुरक्षा भेदून आत कसे आले? त्यांना धुराच्या नळकांडय़ा आणता आल्या तर अन्य घातक वस्तूही त्यांना आणता आल्या असता. या सुरक्षाभंगावर केंद्र सरकारने खासदारांचे निलंबन केले’, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला.