बारामतीमधील जनसन्मान यात्रेत अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. आता बारामतीकरांना मी नाही तर दुसरा आमदार मिळाला पाहिजे, असे अजित पवारांनी म्हटले. यामुळे अजित पवार आता बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही, याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आता पश्चात्ताप करुन काय उपयोग, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे. “अजित पवार हे बारामतीतून निवडणूक हरणार, हे निश्चित आहे. त्यांनाही याची कल्पना आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावर काय बोलू? तुम्ही तुमचे घर मोडलंत. तुमचा पक्ष सोडलात. शरद पवार जे तुमचे नेते आहेत आणि जे तुमच्या वडिलांसारखे आहेत, ज्यांनी तुम्हाला सर्व काही दिलं, त्यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. आता तुम्ही खंजीर खुपसला असेल तर पश्चात्ताप करुन काय उपयोग”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.
- Advertisement -