भाजपाकडे ३० वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पोस्टर चिकटवण्यासाठी माणसं नव्हती. भारतीय जनता पार्टीचा जय म्हणायला तेव्हा दोन टाळकीही नव्हती. अशा वेळी भाजपाला खांद्यावर घेऊन गावागावांत शिवसैनिक फिरले. महाराष्ट्रातल्या भाजपाला शिवसेनेने वाढवलं हे सांगायला कुणीही पंडिताची गरज नाही. देशात कुणालाही विचारलंत तरीही त्याचं उत्तर मिळेल असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्रात कुणामुळे वाढला, फोफावला, तरारला, फुगला आणि सुजला हे सगळ्यांना माहीत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये कृतज्ञता या शब्दाला महत्व आहे. हिंदुत्व जर भाजपा मानत असतील तर कृतज्ञता आणि उपकारांची जाण या दोन शब्दांचा अर्थ त्यांनी समजून घ्यावा. बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक वेळी भाजपासाठी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला आहे. त्याचं स्मरण हे नव्या पिढीने करावं, त्यांना माहीत नसेल तर आम्ही सांगायला तयार आहोत. आज गोपीनाथ मुंडे नाहीत, लालकृष्ण आडवाणी एका बाजूला आहेत. आडवाणी यांनाही विचारलं तरीही ते सांगतील महाराष्ट्रात भाजपा कुणामुळे वाढली? असंही संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याचा निर्णय दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचं पालन करण्यासाठी घेतला होता. त्यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी अटलबिहारी वाजपेयी आणि आडवाणी यांना सांगितलं की गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन मोदींना हटवलंत तर गुजरात हातचं जाईल आणि हिंदुत्वाचं नुकसान होईल. त्यावेळी वाजपेयींनी निर्णय मागे घेतला. आज तेच मोदी दिल्लीत आहेत. त्याच मोदींच्या जोरावर हे महाराष्ट्रातले ओंडके, सोंडके डोळे वटारुन दाखवत आहेत. २०२४ ला हे नसेल असं राऊत यांनी भाजपाला ठणकावलं आहे.