मुंबई, दि. २ : राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतू गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.