मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा धो धो वर्षाव पाहता धरण दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाच्या वर्षी १०० टक्के भरल्याचा आनंद लाभार्थ्यांना होत आहे. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा २६ हजार दशलक्ष घनफूट (१०० टक्के) झाल्याची नोंद मुळा पाटबंधारे विभागाने जाहीर केली.
धरणातून ५० दिवसांपासून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे. मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रावर यंदा वरुणराजाची मोठी कृपा झाली. शासनाकडून शासकीय जलाशय परिचलन सूचीनुसार १६ ते ३० सप्टेंबर या काळामध्ये धरण १०० टक्के भरण्याची सूचना असल्याने त्यानुसार मुळा पाटबंधारे विभागाने धरणसाठा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी २६ हजार दशलक्ष घनफूट पूर्ण करून घेतला.
नंतर अधिक आवकेचे पाणी दरवाज्यासह (७५० क्यूसेक) उजव्या कालव्यातून (६०० क्यूसेक) जायकवाडीच्या दिशेने वाहत आहे. देवनदीद्वारे जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासह वांबोरी चारीला पाणी सोडले जात असून १३२ दशलक्ष घनफूट पाणी वांबोरी चारीला गेले आहे.बोरी चारीचे दोन वीजपंप सुरू आहेत. तिसरा पंप नादुरुस्त आहे. १०२ पैकी २४ बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा होत आहे. नादुरुस्त पंपाचे साहित्य मिळण्यास अडचणी येत असल्याने दुरुस्तीत अडथळा येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सन १९७२ पासून मुळा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला.
५२ पैकी ३५ वेळा यापूर्वी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा मुळा पूर्ण क्षमतेने भरल्याची ३६ वी वेळ आहे. मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख यांनी मुळा धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण राखत आवक- विसर्गाचा समतोल साधल्याने पुराचा धोका टाळण्यात यश आले आहे. जायकवाडी धरणाला मुळातून अधिक विसर्गाद्वारे ७८५० दलघफू पाणी वाहिले आहे. अजूनही मुळा व देवनदीचा प्रवाह जायकवाडीच्या दिशेने वाहतच आहे.
मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील काळात आवकेनुसार विसर्ग कमी-जास्त होणार आहे. हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिल्याने मोठी आवक होण्याची व विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळा नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे.