आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने राज्यभर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शनिवारी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना आणि अंमलबजावणी संदर्भात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं, तसेच महायुतीची आगामी निवडणुकीची रणनीती स्पष्ट केली. यासह त्यांनी महायुतीतील पक्षांच्या प्रवक्त्यांना खडे बोल सुनावले. फडणवीसांनी माहायुतीच्या प्रवक्त्यांना निवडणूक काळात एकमेकांच्या पक्षांविरोधात, नेत्यांविरोधात न बोलण्याची तंबी दिली.
पमुख्यमंत्री म्हणाले, मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रवक्त्यांना विनंती करतो की आपल्यामध्ये समतोल ठेवा. आज आपले प्रवक्ते एकमेकांविरोधात काय काय बोलतात ते सगळं आता बंद केलं पाहिजे. बऱ्याचदा त्यांच्या वक्तव्यांवरून आपला आपापसात विसंवाद असल्याचं दिसतं. त्यामुळे कुणाला जर बोलायची खुमखुमी आलीच असेल तर त्याने त्याच्या नेत्यांकडे जाऊन विचारायला हवं. त्यांनी आपल्या नेत्याला जाऊन विचारावं की मला बोलायची खुमखुमी आली आहे, मी बोलू का? तुमचे नेते जर तुम्हाला हो म्हणाले तर तुम्ही बोलून तुमची खुमखुमी दूर करून घ्या. आम्हाला काहीच अडचण नाही. परंतु, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिलं पाहिजे.