Sunday, July 21, 2024

विधानसभेसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी… बारामतीतून फुंकणार रणशिंग… राज्यभरात जनसन्मान सभा…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आवश्यक उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी अशा शंभर निमंत्रित सदस्यांची बैठक आज मुंबईत पार पडली. महायुती सरकारच्या माध्यमातून आपण विकासाचा झेंडा हाती घेतला असून विकासकामांच्या जोरावर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण विजय प्राप्त करणार असल्याचा निर्धार राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री. अजित पवार यांनी या बैठकीत केला.

विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराला बळी न पडता केवळ विकासात्मक कामांची आणि योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी, महायुतीचं नुकसान होईल अशी वक्तव्य टाळावीत असं स्पष्ट मत ना. अजितदादा पवार यांनी यावेळेस मांडलं. येत्या १४ जुलै रोजी बारामतीमध्ये भव्य सभा आयोजित केली असून राज्यभरात जनसन्मान सभांचं आयोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीला आपण महायुती म्हणून सामोरं जाणार आहोत. त्यासाठी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने समन्वय साधणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल यांनी बैठकीत व्यक्त केलं. याआधीही आपण प्रतिकूल परिस्थितीत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे यंदाही विधानसभेची निवडणूक निश्चित जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना. अजितदादा पवार यांनी यंदा सादर केलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला उभारी देणारा आहे असं म्हणत प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी ना. अजितदादांसह मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. या अर्थसंकल्पातील कल्याणकारी योजनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला प्रसार करायचा आहे. याच विकासात्मक मुद्द्यांवर आपल्याला निवडणूक लढायची असून विकासाच्या मुद्द्यावरच आपण निवडणुकीत यश मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे आपला मतदार आपल्यापासून दुरावला गेला. मात्र विरोधकांसारखा खोटा प्रचार न करता ना. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना आणि महायुती सरकारची विकासात्मक कामे जनतेसमोर घेऊन जात पुन्हा त्यांचा विश्वास संपादन करायचाय असं प्रतिपादन करत ना. छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं.

या बैठकीस सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष मा. नरहरी झिरवळ, जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार मुश्ताक अंतुले यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles