उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज नवाब मलिक यांच्या मतदारसंघात पोहोचली. यावेळी अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची नवाब मलिक यांनी जोरदार स्वागत केलं. आता काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. याबाबत त्यांनी एक पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर आता नवाब मलिक आणि अजित पवार एका व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत. एवढंच नाही तर नवाब मलिक आणि अजित पवार यांनी आज एका गाडीमधून प्रवास केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मी जाहीर करतो की, सना मलिक या आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या असतील.”