मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागात बरसणाऱ्या तुफान पावसाचा फटका फक्त सर्वसामान्यांनाच नाही, तर लोकप्रतिनिधींनाही बसला आहे. पावसाळी अधिवेशनासाठी निघालेले आमदार आणि मंत्रीच ट्रेनमध्ये अडकले. अखेर रेल्वे रुळांवरुन पायी वाट काढत त्यांना पुढचा प्रवास करावा लागत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी आणि मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवर पायी जावं लागलं. विदर्भ सुपरफास्ट एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी मुंबईत प्रवेश केला. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचण्याआधी कुर्ला भागातच त्या अडकल्या. परिणामी पावसाळी अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार-मंत्र्यांनाही फटका बसला आणि ते ट्रेनमध्ये अडकले. दीड तासांपासून ट्रेन अडकून पडली होती. त्यामुळे अनेक जणांनी रुळांवरुन चालत नजीकचे स्टेशन गाठणे पसंत केले.https://x.com/News18lokmat/status/1810184012750553308