मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? असा प्रश्न महायुतीतील नेते विचारत आहेत, पण पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा असेल, असं खुलं आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला.
कालच स्वातंत्र्यदिन झाला, आजपासून पुढच्या लढाईची सुरुवात होत आहे. माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे, की महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आमची तयारी आहे. बोलणं सोपं आहे पण लढाई कठीण आहे. लोकसभेला राजकीय शत्रूंना पाणी पाजलं, ती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आता विधानसभेला महाराष्ट्र धर्मरक्षण, अस्मिता, स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ते महाराष्ट्र लुटायला आलेत. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने लढायला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. फक्त हे आपल्या तिघा मित्रपक्षात व्हायला नको. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि आमच्यात आपसात तू राहशील की मी, असं नको व्हायला, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरे यांनी केली.