भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. नुकताच त्यांनी मुस्लीम महिलांना बुरखा वाटण्याचा कार्यक्रम घेतला. मात्र मित्रपक्षांकडून या कार्यक्रमावर टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांचा अरविंद सावंत यांच्याकडून ५२ हजार मतांनी पराभव झाला होता. भायखळा विधानसभेतच यामिनी जाधव यांना मताधिक्य मिळू शकले नव्हते. त्यानंतर आता मतदारसंघातील मुस्लीम मतांनाही जवळ करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासाठी त्यांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेतला. मात्र आता यावर भाजपानेच आक्षेप घेतला आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी या कार्यक्रमावर टीका केली आहे.
ते म्हणाले, “नेमका काय कार्यक्रम घेतला, याची मला माहिती नाही. पण बुरखा वाटप सारखे कार्यक्रम भाजपाला मान्य नाही.” दि. ७ सप्टेंबर रोजी यामिनी जाधव यांनी आपल्या मतदारसंघात १००० बुरखा वाटले होते. या कार्यक्रमानंतर शिवसेना उबाठा गटाने महायुतीवर टीकेची झोड उटविली आहे.