Saturday, January 25, 2025

नगर शहरातील नगरोत्थान योजनेतील २४ पैकी १३ रस्त्यांची कामे ४५ टक्के पूर्ण, प्रशासक यशवंत डांगे

नगरोत्थान योजनेतील २४ पैकी १३ रस्त्यांची कामे ४५ टक्के पूर्ण

उर्वरित कामेही लवकरच सुरू होणार; प्रशासक यशवंत डांगे यांनी घेतला आढावा

अहिल्यानगर – शहरातील प्रमुख २३ रस्ते व १ नाल्याच्या कामासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. यातील १३ रस्त्यांची कामे प्रगती पथावर असून ही कामे ४५% पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामही लवकरच सुरू होत आहेत. महानगरपालिकेमार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालातील इतर कामांसाठीही लवकरच निधी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या कामांसाठी जानेवारी २०२६ अखेर मुदत आहे. मात्र ही कामे मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डांगे यांनी दिली.

आयुक्त डांगे यांनी शहरात सुरू असलेल्या प्रमुख रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. शासनाने २४ कामे मंजूर केलेली आहेत. त्यात २३ रस्त्यांची कामे व १ नाल्याचे काम आहे. सध्या १३ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे भौतिक दृष्ट्या ४५% पूर्ण झालेली आहेत. तर आर्थिक दृष्ट्या ३०% पूर्ण झाली आहे. या २३ रस्त्यांच्या माध्यमातून सुमारे १७ किलोमीटर लांबीचे रस्ते होणार आहेत. तर दोन किलोमीटर लांबीच्या नाल्याचे सुशोभीकरण होणार आहे.

सदर कामे विकास योजनेतील रस्त्यावर असल्याने विकास योजनेच्या रुंदीप्रमाणे होत आहेत. त्यात अडथळा ठरणारी अतिक्रमण काढणे, इलेक्ट्रिक लाईन, पाण्याची लाईन स्थलांतरीत करून दोन्ही बाजूने गटार करून काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. या कामांकरिता जुलै २०२४ महिन्यात कार्यादेश देण्यात आलेला आहे. कामाची मुदत जानेवारी २०२६ पर्यंत आहे. मात्र, मुदतपूर्व कामे पूर्ण करण्याचा संकल्प महानगर पालिकेने केला आहे. त्या दृष्टीने मनपाचे प्रयत्न असून मनपा आर्थिक दृष्ट्या व प्रशासकीय दृष्ट्या सदर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी सांगितले.

सदर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे. त्याचबरोबर वारंवार रस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची वेळ मनपावर येणार नाही. नागरिकांना चांगली सेवा उपलब्ध होईल. आत्तापर्यंत शासकीय अनुदानातील २१ कोटी रुपये व मनपा हिस्स्यातील ४.५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित हिस्स्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच शासनाकडून पैसे भरण्यासाठी तरतूद करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles