Friday, March 28, 2025

मनपा अधिकारी कर्मचारी यांनी आपला मोबाईल फोन बंद करू नये,आयुक्त डॉ. पंकज जावळे

अहमदनगर-महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी, कर्मचार्‍याने आपत्कालीन काळात सुट्टीवर जाऊ नये. अधिकारी कर्मचारी यांनी आपला मोबाईल फोन बंद करू नये, शहरातील नागरिकांना आपत्कालीन काळात तातडीने मदत देता येईल याचे नियोजन करा, असे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले.

पावसाळ्यापूर्वी शहरातील नैसर्गिक आपत्ती, पूर प्रतिबंधात्मक व आपत्ती व्यवस्थापन यावर विविध उपयोजना करण्यासंदर्भात आयुक्त डॉ.जावळे यांनी बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंढे, लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, शहर अभियंता मनोज पारखे, जल अभियंता परिमल निकम, अभियंता श्रीकांत निंबाळकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, शशिकांत नजन, नाना गोसावी, नगररचनाकार राम चारठाणकर आदी उपस्थित होते. डॉ. जावळे म्हणाले, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणारी विविध ठिकाणे शोधून तेथील कचरा, प्लास्टिक व इतर साहित्य हटवावे.

पाईपच्या अग्रभागी असणारे मटेरियल हटवून प्रवाह मोकळा होण्यासाठी घनकचरा विभागाने कार्यवाही करावी. घनकचरा विभागामार्फत छोट्या नाल्या सफाईसाठी चार प्रभागनिहाय कोटेशन मागवून ते काम सुरू करावे. पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईन लिकेजेस काढण्यात यावीत. पाणी शुध्दीकरणासाठी आवश्यक तो क्लोरीन, ब्लिचींग साठा तयार ठेवावा. नागरी हिवताप योजनेमार्फत पाणी साठणार्‍या ठिकाणी डासोत्पती टाळण्यासाठी औषध फवारणी, नागरी भागात धूर फवारणीचे नियोजन करावे. यासाठी आवश्यकता असल्यास बाह्य यंत्रणेमार्फत कर्मचारी उपलब्ध करून घेण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी.

आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक तो औषधसाठा मनपा आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध ठेवावा. डेंग्यूसदृश आजाराबाबत जनजागृती करावी. घनकचरा विभागाने कचर्‍याचे ढीग तात्काळ उचलण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत. स्वच्छता निरीक्षकांनी दोन दिवसांत पाहणी करून नालीवरील चेंबर झाकणाची यादी बांधकाम विभागाकडे द्यावी आदी सूचना आयुक्त डॉ. जावळे यांनी दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles