पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची आज दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करत आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यातील प्रमुख आरोपी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याला शिरवळमधूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरद मोहोळची हत्या कशी झाली, हे आता समोर आले आहे. शरद मोहोळची सावली म्हणून वावरणाऱ्यांनीच त्याचा काटा काढला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्याकडून आयुष्याची अखेर होईल अशी पुसटशी कल्पनाही दीड दशक दहशत माजवणाऱ्या शरद मोहोळला आली नाही.
शुक्रवारी, 5 जानेवारी रोजी दुपारी शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालायला लागले. पण आपले बॉडीगार्डच आपला थोड्याच वेळात शेवट करणार आहेत याची शरद मोहोळला पुसटशी देखील कल्पना नव्हती. लग्नाचा वाढदिवस साजरा करुन सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही पावले चालला असेल तोच याच साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. तिघांनी त्यांच्याजवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली दीड दशके दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला.
शरद मोहोळचे हे मारेकरी त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्या टोळीत काम करत होते. यातील साहील पोळेकर हा तर हत्येच्या आधी काहीवेळ शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात देखील सहभागी होता. वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नाराज होते. विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणे होती तर साहील पोळेकर याच्यासोबत देखील जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. त्यातून त्यांनी शरद मोहोळच्या हत्येची योजना आखली आणि अतिशय थंड डोक्याने ती अंमलात आणली. या मारेकऱ्यांना शरद मोहोळची हत्या करण्यासाठी त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधी टोळीने पेरलं होतं का याचाही तपास पोलीस करणार आहेत. गुन्हेगारी विश्वातून पुण्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर सत्तेचे सुरक्षाकवच लाभेल असा शरद मोहोळचा होरा होता. पण स्वतःच्या बॉडीगार्ड म्हणून काम करणाऱ्या साथीदारांच्या मनात काय चाललंय हे शरद मोहोळ ओळखू शकला नाही.
जवळच्या साथीदारांची नाराजी मोहोळला भोवली, 24 तास सोबत… सावलीनेच केला घात…
- Advertisement -