शेवगाव -येथील कांदा व्यापारी नाथा ढाकणे यांचा मृतदेह सोमवारी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.कांद्याचे व्यापारी नाथा रामकिसन ढाकणे (वय ४३, मूळ गाव ढाकणवाडी, ता. पाथर्डी, हल्ली मुक्काम खंडोबा मैदान, आखेगाव रोड, शेवगाव) यांचा मृतदेह सोमवारी (दि. ३०) सकाळी ११च्या दरम्यान जुना भगूर-आव्हाणे रस्त्याकडेला एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
सकाळी आव्हाणे येथे निद्रिस्त गणपतीचे दर्शन घेऊन ते आल्याचे काहींनी पाहिले होते. त्यानंतर त्यांची कार (एमएच १६ बीझेड ८०००) उभी आढळली व जवळच झाडाच्या फांदीला त्यांचा मृतदेह लटकल्याचे दिसले.ढाकणे यांनी आत्महत्या केली नाही, तर त्यांची गळफास देऊन हत्या केल्याचा आरोप त्यांचे नातेवाइक करीत आहेत. याबाबत पोलिसांनी तूर्त अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तक्रार आल्यास त्यावरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, ढाकणवाडी (ता. पाथर्डी) येथे मूळ गावी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.