Saturday, January 18, 2025

नगरमध्ये भाजप पदाधिकार्‍यावर खुनी हल्ला, भाजपाचे पोलीस अधीक्षक ओला यांना निवेदन

अहमदनगर-अवैध बांधकामाबाबत प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून 17 जणांच्या टोळक्याने भाजपाचे केडगाव मंडल अध्यक्ष नीलेश भाऊसाहेब सातपुते (वय 38 रा. सातपुते चौक, केडगाव) यांच्यावर लोखंडी टामी, लाठ्या-काठ्याने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 17 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय मोहन पठारे, राजेंद्र मोहन पठारे, प्रशांत बारस्कर, अजय राजू पठारे, विजय राजू पठारे, आकाश औटी, मयुर चावरे, सनी भुजबळ, राहुल झेंडे, गितेश उर्फ भैया पवार, राकेश ठोकळ, परशुराम बुचाळे, सोनू परदेशी, आकाश सांगळे, विशाल दळवी, अंशु चव्हाण, अजय बुचाळे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी (9 सप्टेंबर) रात्री 9:20 ते 9:50 वाजेच्या दरम्यान केडगाव उपनगरातील लिंक रस्त्यावर रंगोली हॉटेलच्या पाठीमागे तिरूपती डेव्हलपर्स जवळ ही घटना घडली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, नगर शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, उपनिरीक्षक के. एस. कपिले यांनी घटनास्थळी धाव घेतली. नीलेश सातपुते व संशयित आरोपी यांचे यापूर्वी देखील वाद झाले आहे. या वादातून व नीलेश यांच्या जागेवर संशयित आरोपी यांनी अवैधरित्या केलेल्या बांधकामाची प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून सोमवारी रात्री संशयित आरोपी संघटीत झाले. त्यांनी कट रचून घातक हत्यार घेेऊन नीलेशवर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नीलेश यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने ओरबाडून नेली. तसेच सातपुते कुटुंबातील सदस्यांनाही मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विकास काळे करत आहेत.

ही घटना अत्यंत गंभीर असून हल्लेखोरांनी सातपुते कुटुंबीय संपवण्यासाठीच हा हल्ला केला आहे. शहरात नागरिकांच्या जमिनींवर हे लँड माफिया सर्रासपणे ताबे मारत आहेत. एकूणच नगर शहरात गेल्या काही वर्षांत असे ताबामारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले असून त्यातून हाणामारी, हत्या देखील झाल्या आहेत. शहरात गुंडांनी मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून पोलीस प्रशासनाने शहरातील गुंड प्रवृत्तीचा बंदोबस्त करावा. केडगावमधील दहशत कमी होण्यासाठी या घटनेतील संशयित आरोपींना तातडीने पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शहर भाजपच्या शिष्ठमंडळाने पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles