नगर-पुणे इंटरसिटी लाईनबाबत कार्यवाही करा
खा. नीलेश लंके यांचे रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश
नगर रेल्वे स्थानकावर आढावा बैठक
नगर : प्रतिनिधी
नगर-पुणे इंटरसिटी लाईन केवळ मेटनन्स पॉईंट नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ही लाईन सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार नीलेश लंके यांनी दिले.
रेल्वेसंदर्भातील विविध अडचणींसंदर्भात खा. नीलेश लंके यांनी बुधवारी नगर येथील रेल्वे व्यवस्थापक यांच्या दालनामध्ये येथे रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत बीड-परळी रेल्वे मार्ग इंगणवाडी पर्यंत पुर्ण झाला असून सुमारे ५० ते ६० किलोमिटरचे काम प्रलंबित आहे. या कामाचा आढावा घेण्यात येऊन हे काम तातडीने पुर्ण करण्यासंदर्भात खा. लंके यांनी सुचना दिल्या. हे काम पुर्ण करण्यासाठी तांत्रिक अडचणी असतील तर त्याविषयी अहवाल तयार करून सादर करण्याचेही त्यांनी सुचित केले.
बैठकीत नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, राहुरी तसेच इतर काही भागामध्ये शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या शेतीमालाच्या वाहतूकीसंदर्भात रेल्वेशी निगडीत अडचणींवरही यावेळी चर्चा झाली. ओव्हर ब्रिज, रेल्वे क्रॉसिंग, अंडरग्राउंड ब्रिज आदी अडचणींचा आढावा घेण्यात येऊन त्या दूर करण्यासाठी खा. लंके यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
बैठकीमध्ये पुणे विभागाचे वरीष्ठ विभागीय अभियंता देवेंद्रकुमार, दौंड-मनमाड रेल्वे लाईनचे उपअभियंता दिपक कुमार, सहाययक अभियंता एस सुरेश, नगरचे सहाय्यक अभियंता त्रिवेदी, वरिष्ठ शाखा अभियंता अजय चोभे, स्टेशन मास्तर एन. पी.तोमर, मुख्य वाणिज्य निरीक्षक पी.जी. वारे, ट्रॅफीक इन्स्पेक्टर तथा रेल्वे सुरक्षा इन्स्पेक्टर सतपाल सिंग, बेलापुरचे वरिष्ठ शाखा अभियंता विनयकुमार यांनी सहभाग नोंदविला.
बैठकीस घनश्याम शेलार, मा. नगरसेवक योगीराज गाडे, मा. नगरसेवक प्रदीप परदेशी, दत्ता जाधव, सरपंच पोपटराव पुंड, अजय लामखडे, शिवाजी होळकर, सचिन पठारे, बाबा काळे, दत्ता खताळ, रामेश्वर निमसे आदी उपस्थित होते.
कोरोना काळातील पॅसेंजर सुरू ठेवा
सध्या अमृत भारत योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी रेल्वेची विकास कामे सुरू आहेेत. या कामांची सद्य स्थिती काय आहे, याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. कोरोना काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या पॅसेंजर ट्रेन्स या कालवधीनंतरही प्रवाशांसाठी सोईच्या होत्या. त्या सुरू करण्याबाबत प्रवाशांची मागणीही होती. या मागणीचा विचार करून या पॅसेंजर सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना खा. लंके यांनी यावेळी दिल्या.
नगर स्थानकावर थांबा द्या
नगर स्थानकावर पुणे-लखनऊ, पुणे गोरखपुर व पुण अंजनी या रेल्वे गाडयांना थांबा नाही. या गाडयांना थांबा मिळावा यासाठी पुणे येथील विभागीय व्यवस्थापक यांच्यामार्फत प्रस्ताव तयार करून कार्यवाही करण्यात यावी अशी सुचना लंके यांनी केली.
ओव्हर ब्रीजची कामे तातडीने मार्गी लावा
दौंड ते मनमाड डबल लाईनचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावर बेलवंडी येथे ओव्हर ब्रीज होणे आवष्यक असून तशी मागणी तेथील ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्गाने केली आहे. या मागणीबाबत कार्यवाही करण्यात यावी या सुचनेवर नगर जिल्हयांतर्गत याच मार्गावर ९ ठिकाणी ओव्हर ब्रीज करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असून लवकरच या कामांना सुरूवात होईल असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापैकी काही कामे सेतूबंधन अंतर्गत करण्यात येणार असून त्याबाबत पाठपुरावा करून ही कामे तातडीने मार्गी लावा असेही खा. लंके यांनी यावेळी सांगितले.
देहरे येथील अंतर्गत रस्ता खुला करा
देहरे येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावांतर्गत रेल्वे लाईनचा रस्ता खुला करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच राहुरी येथे बांबोरी, सडे रेल्वे स्टेशनला त्या रूटच्या रेल्वे गाडयांना थांबा देण्यात यावा, रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याच्या सुचनाही खा. लंके यांनी या बैठकीत दिल्या.