कर्जत : नगर-सोलापूर महामार्गावर स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळणार आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. नगर -सोलापूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना टोलमाफी मिळावी व सुरक्षिततेच्या दृष्टीने नागमठाण व मांदळी या ठिकाणी अंडरपास किंवा ओव्हरपास करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती. याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दखल घेतली आहे. याबाबत धोरणात्मक निर्णयानुसार आणि सुरक्षिततेचा विचार करुन पुढील प्रक्रिया करण्याच्या सूचना ‘केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालया’च्या तांत्रिक सल्लागारांनी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या (एनएचएआय) प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत, असे आ. पवार म्हणाले.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांविषयीच्या विविध मागण्यांबाबत आमदार रोहित पवार यांनी नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी कर्जत तालुक्यातून जाणारा नगर करमाळा महामार्गावर अंडरपास किंवा ओव्हरपास बनवणे, स्थानिक नागरिकांना टोलमाफी देणे, मतदारसंघात ड्राय पोर्टची स्थापना करणे, ग्रीनफिल्ड कॉरीडॉरचं काम तसेच माही जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली होती. याबाबत गडकरी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी या मागणीची पत्रेही दिली होती.