फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार,पीडितेचे जमलेले लग्नही मोडले.. नगर तालुक्यातील घटना

0
38

अहमदनगर-मुली बरोबर प्रेम संबंध असताना काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच जमलेले लग्न मोडल्याचा प्रकार नगर तालुक्यातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने बुधवारी (दि. 13) रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पवन नंदू सोनवणे (रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील एका गावात राहणारी फिर्यादी मुलगी सन 2019 ते जुलै 2021 या दरम्यान अल्पवयीन असताना पवन सोनवणे याने तिच्या बरोबर प्रेम संबंध ठेवले. तिच्या सोबत फोटो काढून ते फोटो नातेवाईकांना पाठविण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच पीडित मुलगी वयात आल्यानंतर 13 जानेवारी 2022 रोजी माळीवाडा येथील एका लॉजवर घेऊन जात तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलीचे लग्न जमलेले असताना तिच्याबाबत लोकांना सांगून जमलेले लग्न मोडले.

नेहमी लोकांना सांगून त्रास देत बदनामी करण्याचा प्रकार पवन सोनवणे याच्याकडून सुरू असल्याने पीडित मुलीने बुधवारी (दि. 13 सप्टेंबर) रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात पोलिसांना सविस्तर माहिती दिली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत पवन सोनवणे विरोधात अत्याचार, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.