अहमदनगर -शाळेत जाणार्या अल्पवयीन मुलीचा जून 2023 पासून पाठलाग करणार्या युवका विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहेर राजेंद्र कांबळे (वय 22 रा. अरणगाव ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरातील एका शाळेत शिक्षण घेते. ती घरापासून शाळेत रिक्षाने जात असताना जून 2023 पासून मेहेर कांबळे हा तिचा पाठलाग करत होता. ऑगस्टमध्ये मेहेर याने मुलीला मोबाईल नंबर दिला व फोन करण्यास सांगितले. फोन केला नाही तर आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच 30 सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास मेहेर फिर्यादी अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी तिच्या राहत्या घराच्या कंपाउंडच्या आत आला.
मुलीचा हात धरून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. दरम्यान, मुलीने आरडाओरडा केला असता मेहेर तेथून पळून गेला. घडलेला प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील अधिक तपास करीत आहेत.